सुविचार :-

सुस्वागतम्

शूरवीरांचा जिल्हा म्हणून प्रसिद्द असणाऱ्या , हिंदवी स्वराजाचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व वारसा लाभलेल्या महाराष्ट्रच्या सातारा या जिल्हातील कृष्णा नदीच्या काठावर असलेले आणि दक्षिण काशी म्हणुन प्रसिद्धीस पावलेले धार्मिक क्षेत्र म्हणजेच वाई , या वाई तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील चंदन -वंदन या गडाच्या कुशीत वसलेले किकली हे गाव.

पुणे-बंगलोर महामार्गावरील खंबाटकी घाट ओलांडला, की पूर्वेकडे रस्त्याला समांतर अशी एक डोंगररांग गेलेली दिसते. या रांगेवरच भुईंज जवळ किकली हे गाव वसलेले आहे , किकली या गावाच्या माथ्यावर चंदन-वंदन ही गडजोडी विसावलेली आहे. श्री. भैरवनाथ हे जागृत दैवत गावाचे ग्रामदैवत आहे. किकली हे शंभर-दीडशे उंबरा असलेले गाव. पण गावात शिरण्यापूर्वीच उजव्या हाताचे भैरवाचे (महादेव) चिरेबंदी मंदिर लक्ष वेधून घेते. आत शिरल्यावर याचे महत्त्व पुढच्या किल्ल्याहून अधिक असल्याचे सहज जाणवते. हेमाडपंती शैलीतील हे यादवकालीन मंदिर! प्रवेशद्वार, मुखमंडप, कक्षासन, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी याची रचना! यातील मंदिराचे भरजरी खांब आणि त्यावरील शिल्पकाम तर केवळ देखणे असे.

ब्रिटीश राजवटीत नारळाच्या कवटीमधील हातबॉम्बची निर्मिती याच गावात झाली . जनावरांचा कोंडवाडा फोडून स्वातंत्र्यक्रांतीची ठिणगी टाकण्याचे काम याच गावांमध्ये झालेआणि तोफेच्या तोंडी जावून देशस्वातंत्र्यसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे थोर क्रांतिकारक हुतात्मा मानाजी बाबरही याच गावचे !!!

सामजिक व सांस्कृतिक क्षेत्रात पूर्वापार अग्रेसर असणाऱ्या या गावची राजकीय कारकिर्दही तितकीच महत्वाची आहे. प्रदीर्घ काळ राजकीय क्षेत्रात उपेक्षित राहिलेले हे गावं मा .खासदार श्री . गजानन बाबर यांच्यामुळे प्रकाश झोतात आले .पुणे जिल्हातील हवेली मतदार संघातून आमदारकीची निवडणूक सलग दोनदा जिकून आणि मावळ मतदार संघातून खासदारकीची निवडणूक जिकून त्यांनी आपलं नाव महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजधानीत सुवर्ण अक्षरांनी लिहिले असून किकली गावाच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा रोवला !!!

पारंपारिक शेती हा इथला प्रमुख व्यवसाय असून दरडोई अत्यल्प जमीनधारणा असूनही जिद्द , चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर इथला शेतकरी स्वावलंबी झाला आहे .स्वावलंबन आणि स्वाभिमानी वृत्ती हे इथल्या लोकांचे वैशिष्ट्यच . गावची बहुतांश शेती विहीर बागायती आहे . किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या मार्गदर्शनातून नेहमी नव नवीन यशस्वी प्रयोग करून शेती उत्पादन वाढीसाठी लोक प्रयत्न करत असतात. तसेच दुग्ध व कुकुटपालन व्यवसाय ही केला जातो