चंदन -वंदन

सातारा जिल्हातील कोरेगाव व वाई तालुक्याच्या सीमेवर असलेल्या चंदन -वंदन या गडावरती जाण्यासाठी किकली गावातून रस्ता असुन तो गडाच्या पायथ्यापर्यत आहे . विजापूरच्या इम्बाहिम (दुसरा) याने हा किल्ला सन १६०० मध्ये बांधला .इ .सन १६७३ साली छत्रपती शिवरायांनी हा गड स्वराजात सामील केला . छत्रपतींच्या नंतर हा किल्ला सन १८१८ मध्ये इंग्रज यांच्या कडे गेला

चंदनच्या प्रवेशद्वाराजवळील रस्ता पूर्वी बराच कठिण होता. मात्र सध्या तेथे असलेल्या मशिदीमुळे हा रस्ता बराच रुंद झाला आहे. दोन अर्धवट पडलेले बुरुज आपणास प्रवेशाद्वाराची जाणीव करून देतात. येथून साधारण १५ पायऱ्या पार गेले असता डाव्या बाजूस एक पडकी वास्तू दिसते. तिच्या वरच्या अंगास एक वडाचे झाड आहे. पाच वडांचा मिळून बनलेला असल्यामुळे त्यास ‘पाचवड” म्हणतात. बाजूलाच एक शंकराचे मंदिर आहे. यातील दोन्ही महादेवाच्या पिंडी या पाच लिंगांच्या आहेत. ग्रामस्थांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. श्रावणात येथे यात्रा असते. ( येथून दहा एक पायऱ्या चढून गेल्यावर समोरच मोठ्या मोठ्या शिळा रचलेल्या दिसतात.) वंदनप्रमाणेच येथेही एक दर्गा आहे. दर्ग्याच्या बाजूस एखाद्या वाड्याच्या भिंतीसारखे आंधकाम आढळते. एका अर्धवट दरवाजासारखे काहीतरी दिसते. साधारण सदरेसारखे येथील बांधकामाचे अवशेष दिसतात. याच्या मागील भागात सुद्धा अनेक उद्ध्वस्त अवशेष आपणास दिसतात. हीच गडावरील मुख्य वस्ती असावी. गडाच्या उत्तर टोकावर मजबूत बांधणीचा अगदी सुस्थितीत असलेला एक बुरूज आढळतो. याच वाटेवर एक समाधी आढळते. याच्या वरील बाजूस अस्पष्ट असे शिवलिंग आहे आणि एका बाजूस आरुतीची मूर्ती आहे. गडाच्या दक्षिणेकडे तीन कोठ्या असलेली पण वरचे छप्पर उडालेली वास्तू आढळते. गावकऱ्यांच्या मते हेकोठार म्हणजे दारूगोळा साठवण्याची जागा होती. गडाच्या मध्यभागी प्रशस्त चौथरा आहे. यावर काय वास्तू होती याचा मात्र अंदाज लागत नाही.

१६७३ च्या सुमारास शिवरायांनी सातारा प्रांत जिंकला आणि त्याचवेळी सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा या किल्ल्यांसोबत यांना देखील स्वराज्यात सामील करून घेतले. पुढे संभाजी राजांच्या कारकिर्दीत सन १६८५ मध्ये फेब्रुवारी महिन्यात अमानुल्ला खानाने चंदन-वंदन येथे असणा-या मराठांच्या तुकडीवर हल्ला केला. या चकमकीत मोघलांच्या हातात २५ घोडी, २० बंदुका, २ निशाणे, १ नगारा सापडला. पुढे १६८९ पर्यंत हा सर्व परिसर मराठांच्या ताब्यात होता. नंतर मात्र तो मोगलांच्या हातात पडला. छत्रपती शाहुमहाराजांनी सन १७०७ मध्ये पावसाळ्यात हा प्रदेश जिंकून घेतला. पुढे सन १७५२ मध्ये ताराबाईवर लक्ष ठेवण्यास पुरेसा फौजफाटा देऊन बाळाजी विश्र्वनाथांनी या किल्ल्यावर दादोपंत यांची नेमणूक केली. नंतर हा किल्ला इंग्रजांच्या हातात पडला.

वंदन चंदनपेक्षा उंचीने जास्त! जणू या दोघांमधील मोठा भाऊ! गडाच्या मध्यावरील ही वाट आणखी थोडी वर चढत वंदनकडे निघते. एकापाठोपाठ दोन दरवाजे. एकेकाळचे भक्कम, पण आता थकलेले! या थकलेल्या शरीरांचे बाजूकडील दोन्ही बुरुज मात्र आजही खणखणीत! त्यावर श्री गणेश आणि षोडशदल कमळाचे शिल्प कोरलेले. या दोन दरवाज्यातील वरचा पहिल्याहून ज्येष्ठ! त्याचा सोपान चढून आत शिरलो की, डाव्या हातालाच एका इमारतीवर फार्सी लिपीतील शिलालेख दिसतो. इसवी सन १६०० मध्ये इब्राहिम आदिलशहा याने गडावर बरीच बांधकामे केली. बहुधा त्याचवेळी हा दरवाजा आणि त्यावरचा हा शिलालेख बसवला गेला असावा. या दरवाज्याच्या आत पहारेकऱ्यांसाठी खोल्या किंवा अस्सल ऐतिहासिक भाषेत ‘अलंगा’ बांधलेल्या दिसतात. पुढे आणखी काही पायऱ्या चढून माथ्यावर आलो की, ओळीने अनेक पडलेल्या इमारतींचे चौथरे दिसतात. स्थानिक लोक याकडे ‘ब्राह्मणआळी’ म्हणतात . एवढी बांधकामे पाहिल्यावर गडावर कधीकाळी बराच राबता असल्याचे वाटते.

गडाच्या मध्यावर एक छोटी टेकडी आहे. या टेकडीलगतच गडकऱ्याचा पडलेला वाडा आहे. जुन्या दफ्तरामध्ये त्याचा उल्लेख ‘सरकारवाडा’ असा आला आहे. या वाडय़ाभोवतीही काही जुनी बांधकामे आहेत. यातच एक तीन खोल्यांची इमारत अद्याप ताठ मानेने उभी आहे. याशिवाय वाटेतच जागोजागी पाण्याची मोठी तळीही दिसतात. हे सारे पाहत पश्चिमेला आलो की, एका विस्तीर्ण तळ्याकाठी मशीद दिसते. मुस्लीम राजवटीतच ती उभी राहिली असावी. पाण्याने इथल्या तळ्याला आणि मुस्लीम बांधवांनी मूळ स्वरुपातील या मशिदीला अद्याप जिवंत ठेवले आहे. या मशिदीच्याच मागे एक स्नानगृह आणि काही थडगी दिसतात. गडाला चहूबाजूने ताशीव कडे असल्याने जिथे आवश्यक आहे त्याच ठिकाणी तट-बुरुजांची चिलखते चढवली आहेत. गडावर मारगिरीच्या जागा फारशा दिसत नसल्या तरी याच वंदनवर असलेल्या एका प्रसिद्ध तोफेचा नाश करण्यासाठी सन १८५७ मध्ये कॅप्टन रॉसची नजर वंदनकडे वळल्याची नोंद एका ठिकाणी आहे. ‘चंदन’वरील शिळा! तासा-दीड तासात वंदन पाहून झाला की, पाठीमागच्या चंदनकडे निघावे. आल्यावाटे खिंडीतून चढून चंदनवर जाता येते. पण ही वाट उभ्या कातळाला छाती लावणारी. तेव्हा अशी सवय नसणाऱ्यांनी गडाला वळसा घालत मळलेल्या वाटेने चंदनवर यावे. या गडाला एकच दरवाजा आहे. तो ओलांडला की, माथ्यावर येतो. इथे महादेवाचे एक मंदिर आणि त्याशेजारी एक भलामोठा वटवृक्ष आहे. इथूनच पुढे पठाराकडे जाऊ लागलो की, वाटेत एक आश्चर्य आडवे येते. वाटेच्या दोन्ही बाजूंना भल्यामोठय़ा आकाराच्या दगडांच्या शिळा एकावर एक रचून ठेवलेल्या आहेत.या दगडांचे आकार-रूप-वजन पाहिले, की हे अजस्र काम कोणी केले याचे आश्चर्य वाटू लागते. पांडवांचे या भागातील वास्तव्य, त्यांचा पराक्रम कानी पडतो आणि मग या प्रचंड शिळांच्या मनोऱ्यालाही चेहरा प्राप्त होतो. पण दुसरीकडे इतिहासकार ग्रॅन्ड डफ या भल्यामोठय़ा शिळांपासूनच गडाचा इतिहास सांगायला सुरुवात करतो. चंदन-वंदनची निर्मिती ही राजा भोजची आणि ही शिळांची रचनाही त्याच्याच हातची! हे आश्चर्य पाहावे आणि पठारावर यावे. इथेही वंदनप्रमाणे घर-वाडय़ांचे अवशेष दिसतात. एक कोरडे तळे तहान वाढवते, पण मग पुढे काही अंतरावर लागणाऱ्या अन्य एका टाक्यातील पाणी ती भागवते देखील. पूर्वेकडून जरंडेश्वर, अजिंक्यतारा, सज्जनगड करत पश्चिमेच्या वैराट, पांडव, कमळ, केंजळगडावर नजर स्थिरावते. तळाच्या हिरव्या शेतीवाडीतून किसन वीर साखर कारखाना आणि बनवाडीचे छोटेसे धरण उठून दिसते.

गडावर जाण्याच्या वाटा :

चंदन आणि वंदन या दोन्ही किल्ल्यांवर जाणा-या सयुंक्त वाटा आहेत. पुणे-सातारा मार्गावर भुईंज गाव आहे. तेथे उतरून ५ कि.मी. अंतरावर किकली गाव आहे. वाई-सातारा या दोन्ही ठिकाणाहून किकलीला येण्यासाठी बस आहे. किकलीच्या जवळच बेलमाची नावाचे गाव आहे. या बेलमाची गावाचे दोन भाग आहेत. एक आहे ती खालची बेलमाची तर दुसरी वरची बेलमाची. येथूनच एक वाट चंदन आणि वंदन यांच्या खिंडीत पोहोचते. डावीकडे राहतो तो चंदन तर उजवीकडे वंदन.