सुविचार :-

शोकांतिका- स्त्रीत्वाची

‘१६ डिसेंबर १९१२ ची रात्र एक काळरात्र म्हणून एका स्त्री साठी ठरली. दिल्ली देशाची राजधानी रात्रीच्या काळोखात एका भयाण घटनेची साक्षीदार ठरली. दामिनी नावाच्या मुलींचा सामुहिक बलात्कार झाला आणि निर्घुण हत्येचा प्रयत्नही.सगळा प्रकार अतिशय घृणास्पद होता. १३ दिवस मृत्यूशी झुंज देउनि ती चीर निद्रेच्या अधीन गेली २९ डिसेंबर ला. ह्या १३ दिवसात देश ढवळून निघाला. ह्या घटनेच्या विरोधात अवघी तरुण पिढी, मेडिया एकीने उभी राहिली. ह्या देशाने तरुणायीचा एक अभूतपूर्व असा संघर्ष पाहिला . नेहमीप्रमाणे सरकारने ह्या आंदोलनाला चिरडून टाकल. अनेक नेत्यांची पोपटपंची , पंतप्रधानांच बोटचेपे धोरण ह्या सगळ्याने स्त्री म्हणून अस्तित्वात असलेल्या जीवाच्या सन्मानाचा प्रश्न उपस्थित केला.

दुर्दैवी दामीनीचा मुर्त्यू झाला पण एक स्त्री म्हणून अनेक प्रश्न उपस्थित करून गेला . तिची मृत्यूशी असलेली झुंज हि संपुष्टात आली हे एका प्रकारे बरच झाल कारण आपल्या देशात पुढील आयुष्यात त्या मुलीला काय काय पहाव लागल असत ह्याची काही गणना होऊच शकत नाही. हा देश स्त्रीला देवी, शक्ती, प्रकृती मानतो , जगातील सर्वोत्तम आणि सर्वोच्च असा अध्यात्माचा , संस्कृतीचा पाया ह्या देशाने जगाला दिला त्या देशात स्त्रीची अशी विटंबना घृणास्पद आणि लाजिरवाणी आहे. गेल्या १०-१५ वर्षात अशा घटनांचा आलेख सतत वाढत चालला आहे हे सगळ्यांच्या लक्षात आल असेल पण कुणीही पुढे येउन काही करण्याच्या मनःस्थितीत नाही. घरातील मुलगी स्त्री हि दिवसागणिक इतकी असुरक्षित कधीच झाली नव्हती जी येत्या काही वर्षात झाली आहे. ह्याची कारण मीमांसा करायला गेल तर अनेक कारण समोर येतात.
मुळात आपल्या देशात स्त्री ला सुरवातीपासूनच चूल आणि मुल इतक्याच भूमिकेपुरत ठेवलं गेल. आर्थिक जबाबदारी हि मुख्यत्वे पुरुषाचीच होती. गेल्या काही वर्षात हे चित्र झपाट्याने बदलत गेल. स्त्री आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र झाली अनेक क्षेत्रात तिची आगेकूच चालू राहिली पण समाजाचा तिच्या प्रतीचा दृष्टीकोन हा कधी बदलला नाही हे दुर्दैव आहे. तीच स्त्रीत्व हेच तिच्या अपमानाच कारण ठरत गेल. एक उपभोगाची वस्तू हा संस्कार हा पुसला गेला नाही. त्यामुळे कितीही कर्तुत्व असल तरी तिची बुद्धी ही शरीर ह्या एका गोष्टीशीच बांधली गेली. समाजात वावरताना पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन तिने कर्तुत्व गाजवलं तरी तीच म्हणाव तस कौतुक समाजाने कधी केल नाही. बाहेर पडल्यावर हव असणार संरक्षण तिला कायद्याने कधी मिळाल नाही. आणि त्याचा आग्रही कधी धरला गेला नाही. समाज गेल्या ३० वर्षात बदलला तो फक्त एकाच दृष्टीकोनाने तो म्हणजे कमावती स्त्री ही एकच अधिकची उपाधी तिला मिळाली.

गेल्या काही वर्षात स्त्रियांवरील अत्याचारामध्ये वाढ होत गेली आहे .सुरवातीला घडणार्या ह्या घटनांकडे फारस लक्ष कुणी दिल नाही कारण झळ हि दुसर्याच्या घराला पोहोचत होती. प्रमाण वाढत होत पण ह्या गोष्टीकडे गांभीर्याने कुणी पाहिलं नाही. ह्या घटनांमध्ये वाढ होणार्या अनेक कारणांमधील एक कारण आहे ते मनोरंजनाच्या क्षेत्रात स्त्रियांच्या शरीराच होणार अश्लीलतेकडे झुकणार चित्रण. पूर्वी टीवी , चित्रपट ह्यात प्रतीकात्मक दाखवल्या जाणार्या गोष्टी कथेची मागणी ह्या नावाखाली सर्रास दाखवायला सुरवात झाली. कॅबेल , टीवी वरील वेगवेगळी चानेल्स , हिंदी चित्रपट ह्या सगळ्यात ह्याच गोष्टीचा सतत मारा होत गेला. मोबईल ह्या यंत्राने तर मानवच आयुष्य पार बदलून टाकल एम एम एस नावाच्या गोष्टीने तर ह्या विकृतीला उधाणच आणल. अश्लील चित्रफिती क्षणात सगळीकडे नेटने पोचवणे सहज शक्य झाल. कुठलाही बटण दाबल कि हवी असलेली माहिती मिळू लागली. चांगल्या गोष्टींपेक्षा विकृती गोष्टींसाठीच ह्याचा उपयोग व्हायला लागला. आणि ह्याच टार्गेट ठरल्या त्या स्त्रियाच. पुरुषांच्या वासनांना बळी पडत गेल्या त्या अनेक अल्पवयीन मुली आणि इतर स्त्रिया. कुणालाच कशाशी घेण देण राहील नाही. डोळे मिटून एका अंधाराकडे वाटचाल समाजाची सुरु झाली. दामिनीच्या उदाहरणाने देश जर सुन्न झाला असला तरी ह्या गोष्टीच्या मुळाशी असलेल्या घटनांचा आढावा कुणी घेण्याचा प्रयत्न करेल अस वाटत नाही. कायद्याने ह्या सगळ्या गोष्टींवर बंदी आणावी ह्यासाठी पाठपुरावा झाला पाहिजे पण इथेही लक्ष कुणी देत नाही

हा प्रश्न फक्त दामीनीचा नाही हा पूर्णपणे स्त्री वर्गाचा आहे. रोज वर्तमान पत्र उघडल कि अनेक मुलींच्या बाबतीत घडलेल्या अत्याचाराच्या घटना वाचनात येतात. लहान लहान मुली ज्यांनी आयुष्य पाहिलं हि नाहीत त्या मुली ह्या असल्या वासनांध पुरुषांच्या वासनेला बळी पडताना दिसतात. ह्या वासनेपुढे मानवी नाती पण काही नाहीत. घराच्या स्त्रीवर अत्याचार करणारा पती असतो ,पिता असतो, भाऊ असतो ,काका असतो ,मामा असतो तर कधी मित्रही .......जन्मदाता जर अस वागू शकतो मग इतरांच काय ? कुठवर मुलीना सुरक्षित ठेवणार आपण?. हि विकृती कायद्याने दूर होणारी नाही तरीही एक कठोर सक्षम कायदा आणि त्याची अंमलबजावणी खूप खूप गरजेची आहे. आपल्या देशात अत्याचाराला बळी ठरलेल्या स्त्रियांनाच खूप काही भोगव लागत. न्याय मिळावा म्हणून झगडाव लागत आणि शेवटी पदरी येतो तो मनस्ताप आणि आयुष्याची वाताहत. हे नक्कीच सुदृढ न्याय व्यवस्थेच चित्र असू शकत नाही. पाश्चिमात्य संस्कृतीच आपल्या देशात येण आणि तरुणायीने त्याच्या आहारी जाण , पैसा हाच देव असा समज दृढ होण, संस्काराची उसवत गेलेली वीण ह्या सगळ्या गोष्टीनी महत्वाच्या सामाजिक स्वास्थ्याचा बोजवारा उडत गेल्या. स्वातंत्र्याच्या असलेल्या चुकीच्या कल्पना आणि त्या कल्पनांनी झालेली अधोगती ह्या सगळ्यांनी ह्या घटना वाढण्यात मोठा हातभार लावला खर तर ह्या देशात स्त्री मुक्ती साठी काम करणाऱ्या अनेक संघटना आहेत पण सध्या त्याचं अस्तित्व कुठेही जाणवत नाही. मध्यंतरी आसाम ची घटना घडली त्या वेळेस जो संदेश लोकांपर्यंत पोहोचला त्यातून इतरांची हिम्मत वाढत गेली. ह्या संघटनांनी कधीही पाठ पुरावा करून स्त्रियांच्या संरक्षणासाठी एका सक्षम कायद्याची लढाई लढलेली आठवत नाही.. गेल्या काही वर्षात ठराविक पक्षांच्या संघटना इतकाच ह्याचं अतित्व राहील आहे. ह्या देशात संसदेत अनेक स्त्रिया आहेत, कायदा क्षेत्रात अनेक स्त्रिया आहेत ह्या न्याय आणि प्रशासन ह्या दोन्ही गोष्टी जाणून आहेत त्यांनी पण ह्या वाढणार्या घटनांकडे केलेलं दुर्लक्ष हे अनाकलनीय आहे.
शहरातील स्त्री असो कि गावातील सगळीकडे ती असुरक्षितच आहे. देश जर समाजाच्या ह्या महत्वाच्या घटकाला काहीच सुरक्षा पुरवू शकणार नसेल तर हे काम पालकांनीच करायला हव. स्त्रियांनी स्वतःच सौरक्षण स्वतःच केल पाहिजे ह्याकरिता आवश्यक ते जुडो कराटे आणि इतर गोष्टी मुलीना शिक्षणा सोबत शिकवल्या गेल्या पाहिजेत किंबहुना त्या सक्तीच्या केल्या पाहिजेत. मुलांना स्त्रियांचा आदर हि गोष्ट शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे. पूर्वी हे नव्हत कारण स्त्री देहाच विकृतीकरण त्यांच्या समोर कधी आल नाही जे आता येत आहे. योग्य ते मार्गदर्शन मुलांना देण्याची गरजही आज निर्माण झाली आहे. मुल जे समोर पाहतात त्याचा त्यांच्या वर परिणाम होतो. अध्यात्मिक , सुसंस्कृत पणाचे संस्कार हे गरजेचे आहेत तेव्हाच थोड्या फार प्रमाणात ह्या गोष्टीना आळा बसेल आणि स्त्रियांना त्याचं सन्माननीय स्थान मिळेल.